Advertisement

Main Ad

विट्ठलाचे टोकन दर्शन उद्यापासून, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग आजपासून*



पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शन प्रणालीची उद्या (दि. १५) प्रथम चाचणी घेण्यात येणार आहे. प्रथम चाचणीदिवशी सुमारे १२०० टोकन उपलब्ध होणार आहेत. त्याचे बुकिंग भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून आजपासून ( दि. १४) उपलब्ध होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बंगळुरू यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे. दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठराविक वेळेत दर्शनहॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. टोकन दर्शन प्रणालीच्या प्रथम चाचणीचे टोकन

१४ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने तयार झालेले टोकन प्रिंट करून, निश्चित करून दिलेल्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पंढरपूरच्या उत्तरेकडील मागीस बाजूस प्रवेश करून टोकनची पडताळणी करून घेणे व तद्नंतर दर्शनहॉलमध्ये प्रवेश दिला जाईल व वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन भाविकांचे सुलभ दर्शन होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments