सोलापूर : पाच हजाराची लाच मागून तीन हजार रुपये स्वीकारणाऱ्या अरुण मारुती शेवाळे (वय ५३, रा. डवरे गल्ली, अक्कलकोट) या तलाठ्याला बुधवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शेवाळे हा आर्मीमध्ये होता, तेथून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यापूर्वीच तो तलाठी म्हणून रुजू झाला होता. दरम्यान, त्याच्या पुणे येथील घराची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे रोख रक्कम, प्लॅट, दागिने असे एकूण जवळपास ४४ लाख रुपयांचे ऐवज सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. तक्रारदाराने अक्कलकोट येथे शेतजमीन रीतसर खरेदी केली. या खरेदी दस्तावरून सात बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी अरूण शेवाळे याने पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ठरलेले ३ हजार रुपये बुधवारी स्वीकारले. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला पकडले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले हे करत आहेत.

0 Comments