सोलापूर, ( जिमाका ) दि. 26: भारत देशाला हस्तलिखितांचा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभलेला असून पारंपारिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या या हस्तलिखितांद्वारे जतन व प्रसारित होत आले आहे. मात्र ही मौल्यवान हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांचे एकत्रित संवर्धन व दस्तऐवजीकरण करण्याची गरज ओळखून भारत सरकारने ‘ज्ञानभारतम् (Gyan Bharatam)’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश देशातील हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, नोंदणी, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करणे हा असून या अंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दिनांक १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेद्वारे देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय, या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) तयार करून तो राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा संग्राहकांकडेच राहणार असून इच्छुकांनी स्वेच्छेने शासनाकडे हस्तांतरण केल्यास ते स्वीकारण्यात येईल.
या मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून महाराष्ट्र राज्यात खालील संस्था प्रकल्पासाठी कार्यरत राहणार आहेत:
क्लस्टर केंद्रे :
कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे
स्वतंत्र केंद्रे :
आनंद आश्रम संस्थान, पुणे
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे
महाराष्ट्र राज्यासाठी पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांची राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून श्री. सुजितकुमार उगले (संचालक) हे राज्य नोडल अधिकारी म्हणून कार्य पाहणार आहेत. तसेच श्रीमती अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था) या सह-नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.
या प्रकल्पासाठी विशेषतः “Gyan Bharatam” मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समित्या स्थापन करणे तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना या सर्वेक्षण मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमात शैक्षणिक संस्था, संशोधक, संस्कृत पाठशाळा, पारंपरिक पंडित, स्वयंसेवक (NCC/NSS), विद्यार्थी तसेच वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
आवाहन
ज्या नागरिकांकडे मौल्यवान हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यांनी त्यांची माहिती “Gyan Bharatam” मोबाईल ॲप वर अपलोड करून या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
00000

0 Comments