Advertisement

Main Ad

उद्योगस्नेही वातावरणामुळे राज्यात उद्योगांचे नवे पर्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाची राज्यात गुंतवणूक


मुंबई, दि. 16 : राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करीत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीत उद्योगांचे नवे पर्व सुरू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह राज्यात करीत असलेली गुंतवणूक त्याचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे सांगितले. राज्यात गुंतवणुकीसाठी येत असलेल्या उद्योग समूहांना राज्य शासन सर्व सहकार्य करीत आहे, गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणुकीसाठी यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
            उद्योग विभागासोबत श्याम स्टील उद्योग आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाने राज्यात गुंतवणुकीसाठी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविलेल्या उद्योग समूहांना प्रत्यक्षपणे उद्योग सुरू करण्यास सुटसुटीत प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यात शाश्वत ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये जेडब्ल्यू ग्लोबल च्या माध्यमातून गुंतवणूक येत आहे. केंद्र शासनाने सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याने ' स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर ' मध्ये गुंतवणूक करण्यास देशात पुढाकार घेतला असून यासाठी दोन सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. राज्याच्या कुठल्याही भागामध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवल्यास राज्य शासन सबंधित उद्योग समूहाला पुरेपूर सहकार्य करेल.
पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात गोडपिंपरी तालुक्यामध्ये दहा हजार कोटीची गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारत आहे. या माध्यमातून जवळपास ८ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच जेडब्ल्यू ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राज्यात जवळपास एक लाख ६५ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात फ्लोटिंग सोलर पावर अँड एनर्जी स्टोरेज च्या माध्यमातून कंपनी १४ हजार ९७६ कोटींची गुंतवणूक करीत असून त्यामुळे कायमस्वरूपी ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच शाश्वत कृत्रिम बुद्धिमत्ता कॅम्पस आणि डाटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिऍक्टर या क्षेत्रात जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह गुंतवणूक करीत आहे. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे राज्यात जवळपास ३ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी अन्बळगण, उद्योग विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, श्याम स्टील उद्योग समूहाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बेरीवाला, व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बेरिवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राणा, जेडब्ल्यू उद्योग समूहाचे अध्यक्ष जयदीप वानखेडे, व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्ती रेनेहान, संचालक संजय वाजे, अतुल गुप्ता, थॉमस पुर्दी आदी उपस्थित होते.
0000

Post a Comment

0 Comments