Advertisement

Main Ad

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुलेआदिवासी विकास विभागाकडून सन 2026-27 साठी 40 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती



सोलापूर, दि.4 (जिमाका):- अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत “परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 40 आदिवासी तरुण-तरुणींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार असून, पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या शिष्यवृत्तीअंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 
शिष्यवृत्ती मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असणार आहे, 

• शिक्षण व परीक्षा शुल्क,
• निवास व भोजनासाठी निर्वाह भत्ता,
• शैक्षणिक आकस्मिक व इतर खर्च, 
• विमान प्रवास खर्च, 
• व्हिसा शुल्क तसेच आरोग्य विमा असलेली आर्थिक 
   मदत दिली जाणार आहे. 

शैक्षणिक आकस्मिक खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी (युनायटेड किंगडम वगळून) दरवर्षी 1500 अमेरिकन डॉलर, तर युनायटेड किंगडमसाठी 1100 जीबीपी इतकी रक्कम देण्यात येईल.

या योजनेसाठी लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत असणे तसेच संबंधित विद्यापीठाची QS World Ranking 200 च्या आत असणे आवश्यक आहे. विहित निकषांनुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत शिथिल करण्यात येणार असून, QS World Ranking मर्यादा 300 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या TOEFL किंवा IELTS अथवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

योजनेचे पात्रता निकष:- 
• विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि  
  महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
• पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका 
  अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे तर पीएचडी 
  अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित 
  करण्यात आली.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असावे.
• TOEFL किंवा IELTS किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण 
  असणे आवश्यक. 

या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज http://fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. निवड समितीमार्फत सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

“राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जागतिक स्तरावरील शिक्षणाच्या स्वप्नांना बळ मिळते. सन 2026-27 या वर्षासाठी 40 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावेत” असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धनंजय झाकर्डे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments