Advertisement

Main Ad

भालेवाडी गावात राज्यातील पहिली “कृषी व ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती” ची स्थापना* *जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम*



सोलापूर, दिनांक ३०: कृषी व ग्रामीण पर्यटनाला नवसंजीवनी देण्याच्या दिशेने सोलापूर जिल्हा प्रशासनाने विकासाच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पात कृषी पर्यटन, कृषी मॉल (Agri Mall), रेशीम शेती, धार्मिक पर्यटन, जल पर्यटन आणि विनयार्ड पर्यटन हे प्रमुख घटक समाविष्ट आहेत. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून भालेवाडी (ता. मंगळवेढा) येथे राज्यातील पहिली “कृषी व ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती” आत्मा अंतर्गत अधिकृतरीत्या नोंदणी करण्यात आली.
 
भालेवाडी हे गाव दुध उत्पादन आणि तृणधान्य (Millets) शेतीसाठी प्रसिद्ध गाव असून “Milk & Millet Village” म्हणून वाटचाल करीत आहे.
या दुध आणि तृणधान्य उत्पादनाचा आधार घेत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शेतकऱ्यांसाठी पूरक उत्पन्नाची निर्मिती करणे, पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध करणे हा समिती स्थापनेमागील प्रमुख हेतू आहे. उपक्रमात स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दुध व प्रक्रिया उद्योग, तृणधान्य उत्पादन व मिलेट-आधारित खाद्य अनुभव, हुरडा पार्टी, पारंपरिक व नैसर्गिक शेती पद्धती, ज्वारी पट्ट्याची वैशिष्ट्ये, ग्रामीण पाककृती, स्थानिक उत्पादन विक्री केंद्र या सर्वांच्या माध्यमातून भालेवाडी गाव राज्यातील आदर्श पर्यटन गाव (Model Village) म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    पुढील काळात कृषी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची उभारणी, प्रशिक्षित गाईड, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था, डिजिटल प्रचार–प्रसार व ब्रँडिंग या उपक्रमामुळे भालेवाडी गाव सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


चौकट - 
“भालेवाडी ग्रामस्थांनी ग्रामीण पर्यटन विकासाच्या क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण केली आहे. हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल. यामुळे केवळ स्थानिक रोजगाराच्या संधीच वाढणार नाहीत, तर गावाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळेल. लवकरच भालेवाडी हे एक 'आदर्श पर्यटन गाव' म्हणून नावारूपास येईल.”
 
— श्री. संतोषकुमार देशमुख
उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी, सोलापूर
                 *******

Post a Comment

0 Comments