Advertisement

Main Ad

*‘व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार**समडोळीत ‘व्ही बी- जी राम जी’ जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा उत्साहात*

सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही बी- जी राम जी’ म्हणजेच ‘विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.

मिरज तालुक्यातील समडोळी येथे ‘व्ही बी- जी राम जी’ कायद्याबाबत जनजागृतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये ते बोलत होते. या ग्रामसभेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, सरपंच सुनीता हजारे, मिरज गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, हा कायदा ‘विकसित भारत @ २०४७’ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत असा ग्रामीण विकासाचा ढाचा निर्माण करण्यासाठी आहे. ग्रामीण भारताचे सक्षमीकरण, विकास, संसाधनांचा समन्वय व सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी हा अधिनियम उपयुक्त ठरणार आहे. शहरांकडे असलेला ओढा व ग्रामीण विकासाच्या विविध गरजा हे सर्व घटक नियोजन करताना विचारात घेतले जातील. या अधिनियमांतर्गत जलसुरक्षेला प्राधान्य, मूलभूत सुविधा, आजीविकेसंबंधी सुविधा आणि तीव्र हवामान घटनांमधून संरक्षण करणारी कामे यांचा समावेश असणार आहे. ही चार क्षेत्रे विकास, सशक्तीकरण, अभिसरण व शाश्वत आजीविकेचा पाया ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, निधीचे योग्य नियोजन करून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येईल. तसेच नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे. ऑनलाइन व नोंदणी-आधारित पाठपुराव्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास करत त्यांनी समडोळी ग्रामपंचायतीने विविध शासकीय अभियान, स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यशस्वी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी ‘व्ही बी- जी राम जी’ योजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चळवळ म्हणून राबवावे, असे आवाहन केले.

सरपंच सुनीता हजारे, वैभव पाटील, संजय बेले, दीपक मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक श्री. जेऊर यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपसरपंच क्रांती पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Post a Comment

0 Comments