सोलापूर, दि. ८ — जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दि. १४ नोव्हेंबर व दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी साखर कारखानदारांसोबत बैठक घेतली. बैठकीत सर्व कारखान्यांनी दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऊस दर जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या निर्देशानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. उर्वरित १५ कारखान्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही तात्काळ दर जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांची गंभीर दखल घेण्यात येईल, असे प्र. उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी संबंधित सर्व ऊस कारखानदारांना कळविण्यात आल्याची माहिती दिली.
*******

0 Comments