Advertisement

Main Ad

समाज कल्याण कडील 2 निवासी शाळा व 16 वस्तीगृहांची तपासणी करावी - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद





सोलापूर, दिनांक 30:- जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालय अंतर्गत सुरू असलेल्या 2 निवासी शाळा तसेच 16 वस्तीगृहांची तपासणी करून या ठिकाणी राहून शिक्षण घेत असलेल्या दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत का याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
    जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता समिती तसेच वस्तीगृह समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते. 
    जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की समाज कल्याण विभाग अंतर्गत दोन निवासी शाळेतील दोनशे विद्यार्थी तसेच 16 वस्तीगृहात राहणारे 1377 विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी समाज कल्याण विभागाने शासन नियमाप्रमाणे महिन्यातून दोन वेळा भेटी देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त यांनी जानेवारी 2026 या महिन्यात प्रांत अधिकारी, तहसीलदार, समाज कल्याण निरीक्षक, वसतिगृह अधीक्षक, समाज कल्याणचे कर्मचारी यांनी उपरोक्त वस्तीहगृह, निवासी शाळांना भेटी देऊन तपासणी करण्याबाबतचे आदेश काढावेत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. 
     तसेच मुलींच्या वस्तीगृहाची तपासणी साठी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. शासकीय वस्तीगृहांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध केला जाऊ शकतो, त्या अनुषंगाने दुरुस्तीस आलेल्या वस्तीगृहांची तपासणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
    प्रारंभी समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनवणे यांनी सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या वतीने दोन निवासी शाळा तसेच सोळा वस्तीगृहे चालवले जात असल्याची माहिती दिली. निवासी शाळा मध्ये 200 विद्यार्थी तर 16 वस्तीगृहामध्ये एकूण 1377 विद्यार्थी असून दहा वस्तीगृहे मुलांची तर 6 वस्तीगृहे मुलींची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 16 पैकी पाच वस्तीगृहे भाड्याच्या इमारतीमध्ये असून ती शासकीय जागेत व्हावी यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
    समाज कल्याण विभागांतर्गत वस्तीगृह निरीक्षक यांच्या माध्यमातून प्रत्येक वस्तीगृहाला प्रत्येक महिन्यात दोन वेळा भेटी देण्याचे नियोजन असते. तसेच भेट दिल्याचा फोटो निरीक्षण ॲपवर अपलोड करावा लागतो, अशी माहिती श्रीमती सोनवणे यांनी दिली.
*जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक - 
       यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कायदा अंतर्गत अत्याचारास बळी पडलेल्या खून अथवा मृत्यू झालेल्या मृत व्यक्तीच्या वारसास शासकीय नियमाने शासकीय अथवा निमशासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. 
    या अंतर्गत सोलापूर शहर पोलीस अंतर्गत प्रलंबित तसेच ग्रामीण पोलीस स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्वरित निपटारा करून अहवाल देण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले. तसेच या समितीच्या अंतर्गत अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कायद्याच्या बाबत जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित करण्याबाबत समाज कल्याण विभागाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशित केले आहे. 
            ********

Post a Comment

0 Comments