सोलापूर: भीमा नदीवर कर्नाटक सरकारने बांधलेल्या सादेपूर येथील बॅरेजेसमधून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या शेतकऱ्यांना सूचना द्यायला हवी होती, या पुढच्या काळात तशी व्यवस्था होईल का अशी विनंती वजा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनद्वारे केली.
कर्नाटक सरकारने उमराणी (सादेपूर, महाराष्ट्र) येथे भीमा नदीवर पाणी साठ्यासाठी बॅरेजेस बांधले आहेत. यावर्षी अवकाळी पावसाने त्यात पाणीसाठा झाला होता. या बंधाऱ्याचे संपूर्ण नियंत्रण कर्नाटक सरकारकडे आहे. येथील कर्मचाऱ्याने बॅरेजेसमध्ये साठलेले पाणी अचानक दरवाजे उघडून सोडून दिले. त्यामुळे नदीकाठच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या. यात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पाणी सोडण्याची पूर्वसूचना दिली असती तर नुकसान टळले असते अशी येथील शेतकऱ्यांची तक्रार आहे.
आमदार देशमुख यांनी सादेपूर बंधाऱ्याची शनिवारी पाहणी केली. त्यानंतर विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधत नुकसानीची माहिती दिली. या पुढील काळात पाणी सोडण्याची पूर्व सूचना देता येईल का अशी विचारणा केली. याप्रसंगी भाजपाचे हणमंत कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, संगप्पा केरके, इराप्पा बिराजदार आदींची उपस्थिती होती.
भूसंपादनाची गरज- भीमा नदीवर सादेपूर येथे कर्नाटक सरकारने बांधलेल्या बॅरेजेसमुळे आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात आल्या आहेत. वास्तविक या जमिनींचे संपादन करून त्यांना मोबदला द्यायला हवा होता. तसे न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याकडेही आ. देशमुख यांनी कर्नाटकच्या जलसंपदा विभागाचे आणि विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

0 Comments