सोलापूर, : शहरातील ओंकार ज्वेलर्स हे दुकान फोडणाऱ्या सराईत गुन्हेगार व एका अल्पवयीन मुलाकडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. ९ जून रोजी शहरातील भवानी पेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानातील चांदीचे व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, दोन इसम हे चोरीचे दागिने घेऊन दोन नंबर बस स्टँड, शास्त्रीनगर येथे थांबले आहेत. त्यानुसार पथकाने धाव घेऊन आरोपी सिध्दनाथ ऊर्फ ढेप्या गंगाधर बंडगर (वय २१, रा.मड्डी वस्ती, भवानी पेठ) एक अल्पवयीन मुलगा यांना चोरी केलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ताब्यात घेतले. त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या नातेवाइकासमक्ष अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १२२० ग्रॅम चांदीच्या वस्तू व ३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, फौजदार मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, आबाजी सावळे, संजय साळुंखे आदींनी केली.

0 Comments