सोलापूर : दहावीत नापास झालेले विद्यार्थी एटीकेटी कोट्यातून उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सोमवार दिनांक 26 एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने पालक व विद्यार्थ्यांनी 27 प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांना शालेय शिक्षण विभागाने उत्तर देऊन मार्गदर्शन केले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय व यासाठी कोण अर्ज करू शकतो? असे याबाबत सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत. सर्व प्रकारच्या मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पास व नापास झालेले विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. ऑफलाईन अर्ज कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाहीत. शालेय शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या संकेतस्थळावरच अर्ज भरावा लागणार आहे व कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन शुल्क स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर सुधारणा करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. एकाच वेळी विद्यार्थ्यांना 10 महाविद्यालयापर्यंत पसंती क्रमांक देणे शक्य आहे.
महाविद्यालयांना इन हाऊस कोटा दहा टक्के, व्यवस्थापन कोटा ५% आणि अल्पसंख्यांक महाविद्यालयांना 50% कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. असा कोटा महाविद्यालयांना राखीव असला तरीही कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज घेतले जाणार नाहीत. या विद्यालयांनाही ऑनलाइन फेऱ्यात सहभागी व्हावे लागणार आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाचे मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला आणि आरक्षणासाठी आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे ठरणार आहे. चुकीची माहिती भरल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे. चार फेऱ्यात प्रवेश दिले जातील. यात शेवटी अल्पसंख्यांक कोट्यासाठी शून्य फेरी व खुली फेरी ठेवण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत अडचण असणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी संबंधित महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी जगताप यांनी केले आहे.

0 Comments