Advertisement

Main Ad

लोकमंगल मल्टिस्टेट बँकेची पाच कोटींची फसवणूक ;शेळगी शाखेच्या कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकारी व कर्जदाराविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दखल




सोलापूर- येथील लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शेळगी (मित्रनगर) शाखेच्या कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकारी व कर्जदाराविरुद्ध पाच कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद जामीनदार विकास वीरय्या गुत्तेदार (रा. लॅण्डमार्क सिव्हिल लाइन, सोलापूर) यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे. १२ फेब्रुवारी २०१६ ते ३० मार्च २०१७ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कर्जदार कुलभूषण वासुदेव गुत्तेदार आणि बँकेचे अधिकारी यांचा गुन्हा नोंदलेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिस सूत्रांनुसार लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शेळगी (मित्र नगर) शाखेचे कर्ज मंजूर करणारे अधिकारी व कर्जदार कुलभूषण वासुदेव उपलप यांनी नमूद कालावधीत १ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह ती रक्कम पाच कोटींवर पोहोचली आहे. त्या दोघांसह सोसायटीचे संचालकांनी आपल्यासह सुभाष जाधव यांची फसवणूक केल्याचे फिर्यादी विकास गुत्तेदार (रा. लॅण्डमार्क सिव्हिल लाइन, सोलापूर) यांचे म्हणणे
आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी कुलभूषण उपलप व संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मिळून सोसायटीतून १२ फेब्रुवारी २०१६ रोजी १ कोटी ९५ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. ३० मार्च २०१७ ला या कर्जाची मुदत संपली. ती रक्कम आता व्याजासह ५ कोटी ४ लाख २९ हजार ९९० रुपये झाली आहे. कर्जासाठी जामीनदार असलेल्यांना जबाबदार धरून सोसायटीने त्यांना लेखी नोटिसा दिल्या आहेत. मात्र कर्ज घेताना जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी जामीनदाराच्या समक्ष होणे अपेक्षित होते. मात्र, सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी तसे झाले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे फौजदार मोहन पवार करीत आहेत.
कल्पना न देता मंजूर केले कर्ज - 
फिर्यादीस कोणतीही कल्पना न देता त्यांनी कर्जदार कुलभूषण उपलप यांना सोसायटीने कर्ज मंजूर केले. त्यात सोसायटीच्या संचालक मंडळासह संबंधित अधिकारी व कर्जदाराने आपली आणि सुभाष जाधव यांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments