Advertisement

Main Ad

एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


सोलापूर :-सन 2024- 25 या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांना एकूण 4599 कोटी 93 लाखाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते तर बँकांनी 4 हजार 759 कोटी 69 लाख इतका कर्ज पुरवठा करून उद्दिष्टापेक्षा अधिक काम केलेले आहे. त्याचप्रमाणेच यावर्षीही रब्बी व खरीप हंगामासाठी देण्यात आलेले पाच हजार दोनशे कोटीचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. तसेच बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पुनर्लोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आरबीआयचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अक्षय गोंदेवार, नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, आरसेटी संचालक दीपक वडेवाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्थापक संतोष कोलते, यांचेसह सर्व शासकीय महामंडळाचे व्यवस्थापक तसेच सर्व बँकाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सर्व बँकांनी पीक कर्ज व कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. पीक कर्जाचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे. यावर्षीच्या हंगामात एकाही शेतकऱ्याचा बँका पीक कर्ज देत नाहीत यासाठी प्रशासनाकडे तक्रार येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी असेही त्यांनी सूचित केले. यावर्षीच्या वार्षिक वित्तपुरवठा आराखड्यात खरीप पिकासाठी 2 हजार 859 कोटी 21 लाख तर रब्बी हंगामासाठी 2 हजार 340 कोटी 79 लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचीत केले. या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व बँकांची प्रत्येक महिन्याला पीक कर्ज वाटप, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच अन्य महत्वपूर्ण शासन पुरस्कार योजनांसाठी बैठका घेण्यात येतील. त्यावेळी सर्व बँकांनी त्यांना पीक कर्ज कृषी क्षेत्रात तसेच शासन पुरस्कृत योजना साठी कर्ज पुरवठा करण्याचे देण्यात आलेले उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या बँका शासन पुरस्कृत योजनांसाठी वित्त पुरवठा करणार नाहीत अशा बँकाबाबत आरबीआय कडे तसेच राज्यस्तरीय पुनर्लोकन समितीकडे अहवाल पाठवण्यात येईल असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले.
 खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्येक बँकांनी व जिल्ह्यातील त्यांच्या प्रत्येक शाखेच्या दर्शनी भागात स्केल ऑफ फायनान्स चा होर्डिंग लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकही शेतकरी पेरणीसाठी आवश्यक पैशाची तरतूद करण्यासाठी खाजगी सावकाराकडे गेला नाही पाहिजे याची जबाबदारी बँकाची असल्याचे त्यांनी सुचित केले. या ठिकाणी अनेक बँकांचे अधिकारी चुकीची आकडेवारी सादर करत आहे तरी पुढील बैठकीला येताना सर्व बँकर्सनी अत्यंत काटेकोर माहिती समितीला सादर केली पाहिजे याबाबत दक्षता घ्यावी. राष्ट्रीयकृत बँकांनी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या खातेदारांना व्याजदरातील सवलतीचा लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करावे यासाठी जिल्हा सहकारी संस्थांचे उपनिबंधक यांनी लक्ष घालावे असेही त्यांनी सुचित केले.
आरसेटी चे संचालक दीपक वडेवाले यांनी मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील बाराशे लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलेले आहे यातील 70 टक्के लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप तसेच शासन पुरस्कृत योजनांसाठी दिलेल्या उद्दिष्ट प्रमाणे वित्तपुरवठा करण्यात येईल असे सांगितले.प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे यांनी जिल्ह्याचा सन 2024- 25 चा वार्षिक वित्तपुरवठा शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप 100% पेक्षा अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वार्षिक वित्तपुरवठा आराखडा उद्दिष्ट 20270 कोटी 42 लाख इतके होते तर 21 हजार 297 कोटी 48 लाख इतके उद्दिष्ट पूर्तता झालेली असून यावर्षीचा वार्षिक वित्तपुरवठा आराखडा 22 हजार 400 कोटीचा असून खरीप व रब्बी पीक कर्जासाठी एकूण पाच हजार दोनशे कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments