सोलापूर, दि. १७ (जिमाका): राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रतिवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस "माहिती अधिकार दिन" म्हणून साजरा केला जातो. यंदा रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे २९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी साजरा करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी कळविले आहे.
या दिनाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवा संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये:
- प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा
- चर्चासत्रे व व्याख्यानमाला
- भित्तीपत्रक स्पर्धा व जनजागृती उपक्रम
या उपक्रमांसाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने पारितोषिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
माहिती अधिकार दिनानिमित्त माहितीचा अधिकार कायदा-२००५ मधील तरतुदींची उजळणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रबोधन, प्राप्त अर्जांची कार्यवाही व अपिलांची सुनावणी पूर्ण करणे, तसेच कार्यालयात जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची माहिती दर्शनी भागात प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे. यावर्षीचे सर्व उपक्रमांचे इतिवृत्त दि. ०३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सुचित केले आहे.
******

0 Comments