सोलापूर : युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ओंकार हजारे (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यांचा मृतदेह सुपर मार्केटजवळील चारचाकी कारमध्ये आढळला होता. ८ जून रोजी ओंकार हजारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आता मयताचा भाऊ विशाल महादेव हजारे यांच्या फिर्यादीवरून मयताची पत्नी स्वाती हिच्यासह आठ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल हजारे यांच्या फिर्यादीनुसार, भाऊ ओंकार व स्वाती यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला. त्यांच्या विवाहासाठी स्वातीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. विवाहानंतर त्यांनी ओंकारला मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. २०२३ मध्ये ओंकार व स्वाती यांच्यात भांडण झाले. त्यानंतर स्वाती व ओंकार विभक्त राहात होते. त्यातून स्वातीने ओंकारकडे घटस्फोटाची मागणी केली. पण, ओंकारने स्वातीला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे स्वातीसह तिच्या कुटुंबीयांनी ओंकारला सतत त्रास द्यायला सुरवात केली. दरम्यान, ८ जूनला त्या त्रासातून त्याने आत्महत्या केली. त्या दिवशी मेव्हण्याचा विवाह असताना देखील त्याला बोलावण्यात आले नव्हते. या प्रकरणी आता स्वाती हजारे, ज्ञानेश्वर हजारे, राजश्री हजारे, मंगेश पवार, नाना काळे, निखिल बनसोडे व ओम घाडगे (सर्वजण रा. सोलापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राधिका जेऊघाले तपास करीत आहेत.
*पोलिसांनी मागविला रक्त तपासणीचा अहवाल*
ओंकार हजारे यांच्या आत्महत्येनंतर मृतदेहाच्या उत्तरीय चाचणीवेळी रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडून त्याचा अहवाल पोलिसांनी मागविला होता. पण, तो रिपोर्ट अजूनही आला नव्हता, या प्रकरणात आता गुन्हा दाखल होताच फौजदार चावडी पोलिसांनी पोलिस उपायुक्तांमार्फत न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पत्र पाठवून तो अहवाल तातडीने मागितला आहे. त्यातून ओंकारच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येणार आहे. तत्पूर्वी, गुन्हा दाखल झालेल्या सर्वांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत.

0 Comments