सोलापूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळा येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नामदेव पायरीचे दर्शन घेण्याचा योग आला. या पवित्र पायरीचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेण्यासारखं पुण्य आहे. संत नामदेव महाराज हे केवळ वारकरी संप्रदायातील एक संत नव्हते, तर भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक होते. त्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशातील 22 राज्यांमध्ये भ्रमण करत भागवत धर्माचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली, त्याला नामदेव महाराजांच्या तत्वज्ञानाचे अधिष्ठान लाभले. या दोघा संतांची भेट वारकरी संप्रदायात अमूल्य विचारांचा संगम म्हणून पाहिले जाते. संत नामदेव महाराज यांनी संत चोखोबा यांची विठ्ठल मंदिर येथे समाधी उभारून समाजाला 'व्यक्ती जन्माने नव्हे, कर्माने मोठा असतो' असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी संत जनाबाई, भक्त पुंडलिक यांच्यासह अनेक भक्तांची चरित्रे लिहिली. त्यांच्या साहित्यशैलीत संवाद, नाट्य आणि भक्तीचा प्रभाव दिसून येतो. मराठीतील गजलांची सुरुवातही त्यांच्या लेखनातूनच झाली. त्यांनी हिंदी आणि पंजाबीत अभंग रचले. ब्रज व शौरसेनी भाषा देखील त्यांना अवगत होत्या. भाषेचा वापर संवादासाठी व्हावा, संघर्षासाठी नव्हे, हा संदेश त्यांनी दिला. गुरु गोविंदसिंग, संत कबीर, संत मीराबाई, संत नरसी मेहता यांच्यासारख्या संतकवींनी देखील संत नामदेव महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण देशभर पसरलेला आहे.
यावेळी पंढरपूर येथील संत नामदेव महाराज मंदिराचा लवकरच जिर्णोद्धार करण्यात येईल. समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच शैक्षणिक व्यवस्थेत अभंगातील संतविचार आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, ह.भ.प. केशव महाराज नामदास, ह.भ.प. माधव महाराज नामदास, ह.भ.प. कृष्णराज महाराज नामदास, ह.भ.प. मुकुंद महाराज नामदास, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

0 Comments