सोलापूर : राज्याचे नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरूवात सोलापूरमधून झाली. २४ जुलै १९८९ रोजी अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी येथे सेवा सुरू केली. महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या आयुक्तपदाच्या काळात शहरात बीओटी तत्त्वावर नवे प्रकल्प उभारले. पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या. त्यांच्या या योगदानाची तसेच सोलापूरशी असलेल्या संबंधाची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू होती.
राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची सोमवारी नियुक्ती झाली. माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी इंद्रभुवनाच्या प्रांगणातील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालिकेच्या राजकारणाचा अभ्यास असलेले सुरेश फलमारी म्हणाले, राजेश कुमार यांच्या काळात शहरात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम झाली होती. प्रशासनावर त्यांची पकड होती. संजय हेमगड्डी म्हणाले, माझ्या महापौरपदाच्या काळात तीन आयुक्त येऊन गेले. यापैकी एक राजेश कुमार होते. शहरात एमएसआरडीसीच्या माध्यमातून रस्ते करणे, बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारणे, मेहताबनगर शेळगी, अवंतीनगर येथे पाण्याची टाकी उभारणी असे विविध निर्णय झाले. पालिकेतील अनेक रोजंदारी सेवकांना कायम करण्याचा निर्णयही त्यांच्या काळात झाला होता.
*पालिकेला मोठी संधी*
सोलापूर महापालिकेचे अनेक प्रश्न नगरविकास खात्यामध्ये प्रलंबित आहेत. ८५० कोटींची पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहे. राजेश कुमार यांना सोलापूरविषयी आस्था असल्यामुळे विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्याची संधी लोकप्रतिनिधींना मिळाल्याची भावनाही अनेकांना बोलून दाखवली.
*वसाहतीलाही नाव*
राजेश कुमार यांचे सोलापूरसाठीचे योगदान पाहाता होटगी रोडच्या बाजूला असलेल्या मिलिट्री कॅन्टीन परिसरातील वसाहतीला राजेश कुमार मीना नगर असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भातील ठराव तत्कालीन महापौर नलिनी चंदेले यांच्या कारकिर्दीत करण्यात आला होता.

0 Comments