Advertisement

Main Ad

एका महिलेसह ४ सराईत गुन्हेगारांना केले तडीपार ; दीड वर्षात १५० जणांवर तडीपारीची कारवाई


सोलापूर : आगामी काळात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता भंग करणाऱ्या गुंडाच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी शनिवारी एका महिलेसह ४ सराईत गुन्हेगारांना सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीचा आदेश दिला. गेल्या पाच महिन्यात शहरातून ३३ तर पोलिस उपायुक्त कबाडे हे रूजू झाल्यापासून १५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

दीपक जाधव (वय २५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं.२, सलगर वस्ती, सोलापूर), सचिन कलप्पा व्हनमाने (वय २७, रा. कल्याण नगर भाग ३, जुळे सोलापूर), कपिल भांडेकर (वय २७, रा. वडार गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर) आणि फरजाना अब्बास शेख (वय ४२, रा. गोदूताई विडी घरकुल) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दीपक जाधव यांच्याविरुध्द दंगा व मारामारी करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. सदर बझार पोलिसांकडून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सचिन व्हनमाने यांच्याविरुध्द घरफोडी, दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुध्द विजापूर नाका पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता.

कपिल भांडेकर यांच्याविरुध्द नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. फौजदार चावडी पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तर फरजाना शेख या महिलेविरुद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे, पाकिट चोरणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. सदर बझार पोलिसांकडून तिच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या चारही प्रस्तावास पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी मंजूरी देत तडीपार केले आहे.

Post a Comment

0 Comments