सोलापूर- कासारवाडी घाटात पत्नीचा खून करून आलेल्या आरोपी पतीस फौजदार चावडी पोलिसांनी पकडून त्याची कसून चौकशी करून शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिल्याने शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.
शुक्रवारी सकाळी ०७.०० वा.च्या सुमारास सचिन चंद्रशेखर राजपूत (वय ३३, रा. हनुमाननगर, शिरोली एम.आय.डी.सी. कोल्हापूर, मूळ रा. कलबुर्गी, ता. जमखंडी) हा फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे आला व त्याने सांगितले की, वर नमूद राहत्या पत्त्यावर त्याने त्याची पत्नी शुभांगी (वय २८) हिच्यावर चाकूने वार केले असून तो घर बंद करून आला आहे. सदरची माहिती मिळताच ठाणे अंमलदार शेळके व मदतनीस पोलीस कर्मचारी कुंभार यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस येथे संपर्क साधून सदरची घटना कळविली. नमूद पोलीस ठाण्याचे पोलीस पथक सदर ठिकाणी गेले असता घर कुलूपबंद असल्याचे आढळले. त्यांनी कुलूप तोडून पाहणी केली असता आतमध्ये संशयास्पद असे काहीही मिळून आले नाही.
त्यानंतर फौजदार राधा जेऊघाले यांनी सहायक फौजदार विद्यासागर जाधव व पोलीस कर्मचारी रोणे यांच्या मदतीने राजपूत यास विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने ५ जून रोजी दुपारनंतर तो मोटारसायकलवरून त्याच्या पत्नीस देवदर्शनासाठी जोतीबा डोंगरावरील मंदिर येथे घेऊन जात असताना पत्नीबरोबर भांडण झाल्याने कोडोली ते जोतीबा मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावरील घाटात निर्जनस्थळी नेऊन पत्नीवर चाकूने वार करून ती बेशुध्द पडल्यानंतर तेथून पळून आला आहे. फौजदार जेऊघाले यांनी सदरची माहिती तत्काळ शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांना दिली व आरोपीने जी.पी.एस. वर दाखविलेले ठिकाण त्यांना कळविले. त्यावरून गायकवाड व पोलीस पथकाने सदर परिसरात जाऊन शोध घेतला असता मुख्य रस्त्यापासून आतमध्ये निर्जनस्थळी त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. सचिन चंद्रशेखर राजपूत याने त्याच्या पत्नीचा खून केल्याचे निषन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन निगराणीमध्ये ठेवण्यात आले व शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आल्यानंतर आरोपीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, फौजदार जेऊघाले, सहायक फौजदार जाधव, अर्चना शेळके, राहुल कुंभार व हरीश रोणे यांनी केली.

0 Comments