सातारा/ सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे उद्या, शुक्रवारी (दि. ६) पालखी मार्ग आणि तळाची पाहणी करणार आहेत. याची सुरूवात दुपारी पंढरपूर येथून होणार आहे. तर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नीरा दत्त घाट येथे ही पाहणी संपेल. सुमारे १४० किलोमीटर अंतराचा हा दौरा असणार आहे.
पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा पुणे, सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात जातो. या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, तळावरील सोयीसुविधा, उपाययोजना याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच सोहळा सुरू होण्यासाठी काही दिवसच राहिले आहेत. त्यामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे हे पालखी मार्ग आणि तळांची पाहणी करणार आहेत.
शुक्रवारी सकाळीच मंत्री गोरे हे पंढरपूरमधूनच पाहणीला सुरूवात करणार आहेत. सकाळी साडे दहाला पंढरपूरमधील ६५ एकर पालखी स्थळ, वाळवंट, आषाढी वारीसंबंधित सर्व स्थळांची विभागस्तरीय तसेच सोलापूर जिल्हास्तर आणि पंढरपूर पालिका अधिकाऱ्यांबोबर पाहणी करणार आहेत. त्यानंतर साडे आकरा वाजता पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वारी संदर्भात आढावा बैठक होणार आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास वाखरी येथे पालखी तळ पाहणी, त्यानंतर भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस आणि नातेपुते येथे सोलापूर जिल्ह्यातील पालखी तळाची ते पाहणी करतील.
दुपारी चार वाजता त्यांचे सातारा जिल्ह्यात आगमन होईल. फलटण तालुक्यातील बरड येथे पालखीतळ पाहणी करतील. त्यानंतर फलटण, तरडगाव येथे पाहणी करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे आगमन आणि पालखी तळ पाहणी होईल. सायंकाळी साडे सहाला निरा दत्तघाट आगमन अन् पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ते पावणे सातच्या सुमारास पुण्याकडे प्रयाण करणार आहेत."

0 Comments