सोलापूर : सोलापूर बस स्थानकातून एका महिलेने तीन वर्षीय मुलीचे अपहरण केले, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती मुलगी मिळून आली. अपहरण करणाऱ्या अनोळखी महिलेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून त्या महिलेचा शोध सुरू आहे.
ईश्वरी लक्ष्मण शिंदे (वय ३) असे पळवून नेलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मण साहेब शिंदे (वय ३४, रा. रानमसले, सध्या सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. लक्ष्मण शिंदे हे पत्नी व मुलगी ईश्वरी यांच्यासह बार्शीला जाण्यासाठी सोलापूर एस टी स्टॅन्ड येथे आले होते. शिंदे हे तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबले होते. तर ईश्वरी ही तिच्या आईबरोबर रांगेपासून काही अंतरावर थांबली होती. दरम्यान लक्ष्मण शिंदे यांनी सुट्टे पैशासाठी पत्नीला बोलावले. शिंदे यांच्या पत्नी पैसे देण्यासाठी गेल्या. मुलगी
ईश्वरी तेथेच थांबली होती. पैसे देऊन परत येईपर्यंत मुलगी ईश्वरी दिसून आली नाही. त्यानंतर आजूबाजूला शोध घेऊन ती मिळनू न आल्याने त्यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली. त्यावेळी पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एस टी स्टॅन्ड गाठून सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. त्यावेळी एक महिला ही ईश्वरीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांची काही पथके विविध ठिकाणी रवाना केली. पोलिसांचे एक पथक मोहोळ येथील बस स्थानकावर पोहोचले. येथील फुटेज तपासल्यानंतर ईश्वरीला घेऊन जाणारी महिला पुणे रोडवर जाताना दिसून आली. त्यानंतर पोलिस पथक हे मोडनिंब येथे पोहोचल्यानंतर येथील एका मंगल कार्यालयासमोर या चिमुकलीला सोडून ती महिला पळून गेली. शुक्रवारी रात्री फौजदार चावडी येथे लक्ष्मण शिंदे यांच्याकडे ईश्वरीला सुपूर्द केले.

0 Comments