टेंभुर्णी -उजनी धरण परिसरात गेल्या आठ दिवसांत ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने उजनी धरणाची पाणीपातळी १५ मेपासून स्थिर राहिली आहे. १४ मे रोजी वजा २२.९६ टक्के पाणीपातळी खाली गेली होती. गुरुवारी सकाळी सहा वाजता वजा २२.३१ टक्के असून अर्धा टक्क्याने उजनी धरणाची पाणीपातळी वाढली आहे. भीमा खोऱ्यातील पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून असते. दौंड येथून विसर्ग चालू झाल्यास उजनीची पाणीपातळी वाढण्यास मदत होते. गतवर्षी ९ जूनपासून दौंड येथून विसर्ग येण्यास सुरुवात झाली होती. यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली होती. गेल्या आठवड्यापासून उजनी धरण परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर राहिली आहे. सध्या उजनी धरणातून मुख्य कालव्यातून १ हजार २०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

0 Comments