सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या ११० किलोमीटरपैकी शेवटच्या सात मीटरच्या पाइपची जोडणी गुरुवारी सायंकाळी पूर्ण झाली. उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्याकडे जाणाऱ्या धाराशिव नगरपालिकेच्या 'इवल्याशा' १६ इंची पाइपलाइनखालून सोलापूर महापालिकेने दीड मीटर व्यासाचा पाइप टाकला. समांतर जलवाहिनीचे पाइपलाइन टाकण्याचे संपूर्ण काम फत्ते झाले असून, आता कोणत्याही क्षणी धरणातून पाणी उपसा सुरू होणार आहे.
समांतर जलवाहिनीच्या कामाला जून २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगचे अडथळे, खासगी जमिनीचे भूसंपादन असे विविध प्रकारचे अडथळे पार करीत हे काम पूर्ण करण्यात महापालिका प्रशासन, स्मार्ट सिटी कंपनी, जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार पोचमपाड कंपनीच्या अधिकाऱ्यांना यश आले. उजनी धरणाजवळ खासगी शेतजमिनीतून पाइपलाइन टाकण्यासाठी तीन दिवसांपासून खोदाई सुरू होती. उजनी धरणातून धाराशिव नगरपालिकेची योजना सुरू आहे. या पाइपलाइनच्या खालून सोलापूरची पाइपलाइन टाकण्यात आली.
कामगारांनी धाराशिवच्या जलवाहिनीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होऊ देता हे काम पूर्ण केल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी जीवन प्राधिकरणचे एम. हरिश, स्मार्ट सिटीचे उमर बागवान आणि पोचमपाड कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील दिवसभर ठाण मांडून होते.
आता प्रतीक्षा चाचणीची -
समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता महापालिकेने पंपगृहातून पाणी उपशाची चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत पहिला पंप सुरू होण्याची शक्यता आहे. या चाचणीमध्ये जलवाहिनीच्या जोडण्या, गळती, एअर व्हॉल्व्हची चाचणी होणार आहे.
गेली दोन वर्षे समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामात अनेक अडथळे आले. हे अडथळे पार करून विठ्ठलाची भीमा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या दारात आणण्याचे भाग्य आम्हा अधिकाऱ्यांना लाभले याचा आनंद आहे.
व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका.

0 Comments