Advertisement

Main Ad

सोलापूर विद्यापीठात 'लोककलेच्या ललकारा'चा जल्लोष!अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त योगेश चिकटगावकरांकडून दमदार सादरीकरण

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित मुंबईचे प्रसिद्ध लोककलावंत योगेश चिकटगावकर यांच्या 'लोककलेचा ललकारा'चा कार्यक्रम अतिशय जल्लोष व उत्साहात पार पडला. यावेळी योगेश चिकटगावकर व त्यांच्या सहकारी कलाकारांनी जुन्या काळातील पिंगळा, वासुदेव, भारुड, गोंधळ आदी लोकगीते सादर करीत लोककला व लोकसंस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त गेल्या सोमवारपासून विद्यापीठात विविध कार्यक्रम पार पडत आहेत. गुरुवारी लोकगीतांचा कार्यक्रम रंगला. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

'गणेश वंदन' सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर योगेश चिकटगावकर यांनी गोंधळ गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणायला सुरुवात केली. त्यानंतर 'ज्योत होऊन जळाली.. देवी अहिल्या मर्दानी...' या अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावरील गीत सादर करून अहिल्यादेवींचा जयजयकार केला. हरीश तांबोळी यांनी गौळण सादर केली तर विकास साळवे यांनी जय जय होळकरशाहीचा हा पोवाडा सादर केला. नंतर पुन्हा योगेश चिकटगावकर यांनी पिंगळा या लोककलेचे सुंदर दर्शन प्रेक्षकांना घडविले. आपल्या पहाडी व दमदार आवाजात एकापेक्षा एक सुंदर अशी लोकगीते सादर करीत त्यांनी सर्वांची मने जिंकली. प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या निनादात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारुड या लोककला प्रकाराचे देखील यावेळी सादरीकरण झाले. त्यानंतर प्रवीण जाधव यांनीही पोवाडा सादर केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले.

फोटो ओळी 
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मुंबईचे प्रसिद्ध लोककलावंत योगेश चिकटगावकर यांच्या 'लोककलेचा ललकारा'चा कार्यक्रम अतिशय जल्लोष व उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments