सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत रविवार (दि. १ जून) रोजी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ होणार आहे. यासाठी आवश्यक ओळखपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच, परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उदभवणाऱ्या अडचणी अथवा आंदोलन, वाहतूक समस्या, अतिवृष्टी लक्षात घेऊन परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित केंद्रावर उपस्थित राहणे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे आयोगाचे सहसचिव यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील आयोगाच्या सूचना तसेच संकेतस्थळावर देण्यात आलेले नियम यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे.
सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर स्वेच्छाधिकारानुसार कालावधीसाठी कायमस्वरुपी आयोगाच्या ठराविक अथवा प्रतिरोधकाची कारवाई करण्यात येईल असेही पत्रात म्हटले आहे. प्रवेशपत्र मिळण्यास अडचणी असल्यास ०२२६९१२३९१४ यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments