सोलापूर दि १८ - सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सोलापूर येथील अनेक वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात अनेक संत आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनातून मिळालेली ऊर्जा घेऊन सोलापूर येथे संघटितपणे सनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आम्ही सहभागी होणार’, असे अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, अधिवक्ता चंद्रशेखर बारद, अधिवक्ता रमेश पाटील, अधिवक्ता शिवाजी होटकर, अधिवक्ता सतीश गाजूल, अधिवक्ता राम देशेट्टी, तसेच अधिवक्ता अर्चना बोगम, अधिवक्ता राजलक्ष्मी म्हंता यांनी सांगितले. या महोत्सवासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सौ. कुंदा जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीसह २३ देशांतील २० हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेत.
महोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी’च्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण ‘भगवान परशुराम सुवर्णद्वार’, नगरीतील सात मार्गांना ‘सप्तर्षीं’ची, तर तीन मुख्य मोठ्या सभामंडपांना ‘श्रीनिवास मंडपम’, ‘श्रीदेवी मंडपम’ आणि ‘भूदेवी मंडपम’ अशी नावे देण्यात आली आहेत. महोत्सवस्थळी भोजनासाठी एकूण १५ मंडप उभारण्यात आले असून त्यांची नावेही देवतांच्या नावाने देण्यात आली आहेत. भगवान श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह गोवर्धन पर्वत उचलतांनाचे श्रीकृष्णाचे, तसेच अफजलखान वधाचे कटआऊट उभारण्यात आले आहेत. या वेळी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या वतीने १ हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन सर्वांना करण्यात आले.

0 Comments