*पुरात मुलगा गमावलेल्या गौडगाव येथील शिरालकर कुटुंबाला तातडीची चार लाखाची मदत देण्याचे निर्देश
*हिंगणी येथील द्राक्ष फळबागेच्या नुकसानीची पाहणी
सोलापूर, दि. २५ : बार्शी तालुक्यातील गौडगाव परिसरात अतिवृष्टी व पुरामुळे खूप मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील पिके, फळबागा तसेच वाहून गेलेल्या जमिनी, घरांचे, घरातील अन्नधान्यांचे झालेले नुकसान यांचा समावेश भरपाईमध्ये करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे ग्राम विकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकसानग्रस्तांना दिले.
आज सकाळपासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बार्शी तालुक्यातील गौडगाव, जामगाव पा., उपळे, धुमाले, हिंगणी, मळेगाव व बावी या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली व येथील नागरिकांचे संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत,
प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, बार्शी तहसीलदार एफ.आर. शेख, माजी सभापती अनिल डिसले, मदन दराडे, माजी सभापती केशव घोगरे, संतोष निंबाळकर, प्रमोद वाघमोडे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे यांनी बार्शी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. हिंगणी येथील द्राक्ष फळबागाच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे त्यांनी सूचित केले आहे. नुकसानग्रस्तांनी धीर धरावा, शासन पूर्णपणे पाठीशी असून लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. या आपत्तीच्या काळात प्रशासनाने ही चांगले काम केलेले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करणे, तसेच त्यांना त्या ठिकाणी फूड पॉकेट, पाणी वेळेत देणे महत्त्वाचे होते.
गौडगाव येथील शिरालकर कुटुंबातला मुलगा रामेेश्वर केेशव शिरवळकर पुराच्या पाण्यात मृत्यू पावलेला होता, त्या कुटुंबाचे सांत्वन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन केले. तसेच शिरालकर कुटुंबाला शासनाच्या वतीने तात्काळ मदत म्हणून चार लाखाचा धनादेश देण्याचे निर्देश दिले.
********

0 Comments