सोलापूर,टेंभुर्णी : उजनी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथील विसर्गात घट झाली असून, दौंड येथून १४ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. दौंड येथील विसर्गात घट झाली असली तरी 'उजनी'ची पाणीपातळी सायंकाळी ६ वाजता ५७.५० टक्के झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत ६० टक्क्यांपर्यत पोहोचणार आहे.
गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे दौंड येथील विसर्ग २० हजार क्युसेकपर्यंत गेला होता. मात्र, सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दौंड येथील विसर्ग घटत गेला आहे. गेल्या आठ दिवसांत उजनी धरणात २० टक्के पाणीपातळी वाढली आहे. गेल्या गुरुवारी उजनीची पाणीपातळी ३७ टक्के होती. सध्या उजनी धरणात एकूण ९४.४६ टीएमसी पाणीसाठा असून ३०.८० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन दिवसांत चार टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. १ जूनपासून ६७मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १९ जूनला उजनी धरणाची पाणीपातळी वजा ४६.७१ टक्के होती. गतवर्षीचा तुलनेत सध्या १०४ टक्के अधिक पाणीसाठा आहे.

0 Comments