Advertisement

Main Ad

शेतकर्‍यांच्या मागण्यांसदर्भात आ. देशमुख यांनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट;दक्षिण तालुक्यात कृषी भवन करण्याची मागणी




 सोलापूर- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात आ. सुभाष देशमुख यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत दक्षिण सोलापूर तालुक्यात कृषी भवन आणि कृषी मॉल उभारणीच्या प्रस्ताव आ. देशमुख यांनी मांडला. राज्यभरात कृषी भवन उभारणीसाठी अंमलबजावणी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.
 आ. देशमुख यांनी सोलापूरमधील अन्न उत्कृष्टता केंद्र हे स्मार्ट प्रकल्पांतर्गत गतीने पूर्ण करणे , सिंचन सुविधांचा विस्तार करावा, सामूहिक शेततळ्यांसाठी निधी वाढवणे, क्षारपट जमिनींचे पुनर्वसन करावे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे तसेच स्वतंत्र सेंद्रिय खते दुकाने सुरू करण्यासंदर्भातही सखोल चर्चा झाली.
  एक गाव - एक पीक’ या योजनेंतर्गत तालुक्यातील निवडलेल्या गावांमध्ये पायलट प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार अंत्रोळी (द्राक्षे), मंद्रूप (गुलछडी), वडजी (गुलाब), बक्षीहिप्परगे (गाजर) आणि बोरामणी (घेवडा) या गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे अंमलात आणली जाणार आहे.
  बसवनगर येथे कृषी मॉल स्थापन करण्याबाबत तसेच करमाळा भागात केळी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी जागा पाहण्याच्या सूचनाही यावेळी कृषिमंत्र्यांनी दिल्या. पीक विमा योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक तलाठ्यांना जबाबदारी देण्याच्या नवकल्पनेवरही सकारात्मक चर्चा झाली. सर्व प्रस्तावांवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सकारात्मक भूमिका घेत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. या बैठकीला कृषी आयुक्त सुरज मांढरे,पणन सहसचिव विजय लहाने, कृषी उपसचिव अंबादास चंदनशिवे, डॉक्टर राजेंद्र भिलारे, मिलिंद डोके, सुधीर नाईकवाडी, सागर पेंडभाने आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments