सोलापूर- सोलापूरसह पुणे जिल्ह्यात गेल्या ८ दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. शिवाय पुढील ३ दिवस आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या ३६ तासात धरणात तब्बल २.७३ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा रविवारी वजा १९.४३ टक्के होते. भर पडल्याने ते वजा १४.३३ टक्के झाले आहे. धरणातील जलाशयाची वाटचाल उणेतून बाहेर पडण्याकडे सुरू झाली आहे. मृतसाठ्यात गेलेल्या धरणात पाणीसाठा वाढत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. २४ मे रोजी सकाळी उजनी धरणात ५३.३५ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा साठा ५५.९८ टीएमसीवर पोहचला होता. रात्री दौंण्डमधून धरणात १० हजार ६८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. तो विसर्ग रात्री उशीरापर्यंत कायम होता. त्यामुळे धरण साठ्यात आणखी वाढ होणार आहे.

0 Comments