सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार १९ मे २०२५ रोजीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, अकरावीसाठी शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया १५ मे २०२५ ला संपली आहे. यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन होणार असून विद्यार्थ्यांचा कॉलेजमधील प्रवेश पारदर्शक पद्धतीने सहज, सोप्पा अन् सुलभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यामिक शिक्षण विभागाने दिली.
दहावीचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थी, पालकांना वेध लागले ते अकरावी प्रवेशाचे. दरवर्षी ऑफलाइन पद्धतीने होणारे प्रवेश यंदा ऑनलाइन होणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. सोमवार १९ मे २०२५पासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. एका विद्यार्थ्यांस एकाचवेळी पसंतीचे दहा कॉलेज निवडता येणार आहे.
अर्जासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क
विद्यार्थ्याने जर मेरिट यादीनुसार
लागलेल्या कॉलेजला राऊंडमध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाहीतर त्यास राऊंड ३ पर्यंत कोठेही प्रवेश घेता येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांना ऑनलाइन पदञधतीने भरावे लागणार असून ती रक्कम शासनाला मिळणार आहे.
*असे आहेत प्रवेशाचे टप्पे*
1) कोटा प्रवेश - इन हाऊस व मॅनेजमेंट कोटा व इतर कोटाप्रमाणे प्रवेश होतील
2) पहिली, दुसरी अन् तिसरी फेरी -गुणवत्ता, प्राधान्यक्रम व आरक्षण धोरणानुसार तीन फेरीत प्रवेश होतील
3) ओपन टू ऑल - प्रवेश न मिळालेल्या सर्वांसाठी खुली, गुणवत्ता व प्राधान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी ओपन टू ऑल राहणार आहे.
4) एटीकेटीचे प्रवेश - यात उर्वरित सर्व प्रवेश तसेच एटीकेटीचे प्रवेश होतील येथे आरक्षण लागू राहणार नाही
ऑनलाइन वेळापत्रक संपूर्ण राज्यासाठी एकच असणार आहे. यंदाच्या वर्षी पारदर्शक पद्धतीने अकरावीचे प्रवेश होतील. गुणवत्ता, आरक्षणानुसार ज्या त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांनी प्रवेशासाठी शिक्षण विभागास सहकार्य करावे.-
सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.

0 Comments